Pages

Ads 468x60px

Thursday 27 August 2015

अजून उजाडत नाही

अजून उजाडत नाही ग !

दशकांमागुन सरली दशके अन्‌ शतकांच्या गाथा ग !
ना वाटांचा मोह सुटे वा ना मोहाच्या वाटा ग !
पथ चकव्याचा, गोल, सरळ वा- कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला? फरफट अवघी ! पान जळातून वाही ग ..
अजून उजाडत नाही ग !

कधी वाटते ’दिवस’ ’रात्र’ हे नसते काही असले ग
त्यांच्यालेखी रात्र सदाची ज्यांचे डोळे मिटले ग
स्पर्श आंधळे, गंध आंधळे, भवताली वनराई ग
तमातली भेसूर शांतता .. कानी कूजन नाही ग ..
अजून उजाडत नाही ग !

एकच पळभर एखादी कळ अशी सणाणून जाते ग
क्षणात विरती अवघे पडदे लख्ख काही चमचमते ग !
ती कळ सरते .. हुरहुर उरते अन्‌ पिकण्याची घाई ग
वरवर सारे शिंपण, काही आतुन उमलत नाही ग
अजून उजाडत नाही ग !

0 comments:

Post a Comment